Monday, 26 December 2011

शर्यत


Disclaimer : - सदर लेखात काही शब्द मुद्दाम शुद्ध लेखनाच्या दृष्टीने चुकीच्या आहेत. त्या आहे तश्याच वाचाव्यात. कारण असं आहे की, आजन्म जर इंग्रजीचा प्रभाव असलेलं मराठी बोलत असणा-या लोकांना जर गावरान भाषेत बोलायला लावलं तर काय प्रकार होतो, हा त्या मागचा हेतू आहे.

    परवा Friday evening  ला movie बघायचं ठरवलं. कोणता बघायचा ही चर्चा सुरु असताना मित्राचा मराठी बाणा जागा झाला आणि आम्ही मराठी चित्रपट बघायचं ठरवलं. चित्रपटाचं नाव शर्यत थेटर मंगला वेळ संध्याकाळी ८. ऑफिस मधील काम उरकून (काम नाहीचे कारण Notice Period) म्हणजे टाईमपास करून ८ वाजता थेटरात पोहोचलो चित्रपट वेळेवर सुरु झाला. सुरुवातीला प्रस्तावना सदर करताना कलाकारांची नावे येगळया स्टाईल मध्ये दाखवली म्हणजे ३ D सिनेमा जर गॉगल काढून बघितला तर कसा दिसेल, तसा प्रकार होता. आनंद झाला, की मराठीत सुद्धा  D प्रकार आला. पण  D गॉगल दिलं नसल्यानं जरा गोंधळलो होतो. Ticket checker शी गॉगल विषयी बोलणार एवढयात चित्र स्वच्छ दिसायला लागलं आणि ३ D चा ताप उतरला. चित्रपट सुरु झाला.
     चित्रपटाची स्टार्ट बैलगाड्यांच्या शर्यतीने होते. त्यात सुरुवातीलाच एक बैलगाडीचे चाक निखळते आणि गाडी व बैल २ ही पडतात व शर्यत हारतात. हा धक्का सहन होत नाही म्हणून त्या बैलांचे मालक हार्ट अटक नं कायमचे Wheel chair वर बसतात आणि चित्रपट ५ वर्षे पुढे. पुन्हा तेच मालक त्यांच्याच भव्य वाड्यात त्याच Wheel chair वर बसलेले दाखवले. लहानपणी हारलेली शरत त्यांला आठवती अन uneasy feeling मध्ये ते खुर्ची ढकलतात. खुर्ची सहित मालक जिन्यावरून खाली. मालक सांडणार तेवढ्यात अंधारातून एक हात येतो. (गावाकडच वातावरन दाखवायचा म्हणून अंधार नि लोड शेडींग चा वापर केलं हितं.) फक्तच हात म्हंजी Horror movie असं वाटत असतानाचं त्या हाताची Full body दिसते. त्यो हात अन ती body म्हणजे पिक्चरचा Hero. हा Hero कोण, तर आपले ‘महागुरू’. Action पिक्चरचा Hero महागुरू, झाला ना तरास, त्यापेक्षा मला लिहिताना झालाय आणि बघताना तिप्पट झालाय कारण, “मंगला मध्ये आधी कोण पोचणार?”  ही शरत मी जिंकलो असल्यामुळे इतर दोन मित्रांची तिकिटे मीच काढली होती.
     महागुरूंचा नाव धनंजय असतं चित्रपटात. धनंजयचे आभार ताईसाहेब मानतात व त्यांना का बोलावलं हे सांगतात. यंदा होणारी शरत ही शेवटची शरत असते. कारण गावच्या विकासासाठी गावात पूल होणार असतो. So शरत बंद next year पासून आणि जो या वर्षी शरत जिकल त्यो दरवर्षी महादेवाच्या जत्रत पल्यांदा पूजा करणार. महागुरूंनी ही शरत जिकायची म्हंजी मालक पूजा करणार पल्यांदा महादेवाची. पण ५ वर्षापूर्वी शरत हरली असल्याने, बैल जखमी झाल्याने आणि मालक अधू झाल्याने अपराधी वाटून त्ये नाही म्हनतात आणि शहरात निघून जातात. शहरी वातावरन म्हणून पुढच्या सीन ला एक जुगार अड्डा दाखवला आहे. तिथे भाग्यलक्ष्मी(नेहा पेंडसे) चं आयटम सॉँग, शीलाच्या आयचा घो आणि मुन्नीच्या नानाची टांग. आयटम सोडली तर  गाणं अतिशय टुकार. ह्या गाण्यात आणखीन एक पात्र दाखवलं आहे, संतोष जुवेकर म्हणजे हीरो चा लहान भाऊ. खरं तर ह्या सोन्ड्याची गरजच नाहीये चित्रपटात, पण  महागुरुंना एकट वाटू नये  म्हणून ह्याला घेतलाय चित्रपटात. आणि तसही ह्याला घेतल नसतं तरी चित्रपट असाच झाला असता.
     तर हा त्या जुगाराच्या अड्ड्यावर गुण उधळत असतो. उधळणारचं कारण ज्याचा मोठा भाऊच महागुरू आहे त्याला दुसरं काही करायची काय गरज आहे ? बर जुगारासुद्धा हा चीटींग करून चं खेळत असतो. आयटमला बघून हा चेकाळतो आणि डॅन्स करायला लागतो. डॅन्स करताना सगळीकडे लपवलेले पत्ते पडतात. त्याची चीटींग पकडली म्हणून अड्ड्याचा मालक Eureka Eureka ओरडतो आणि त्याला बदडतो. महागुरूंना कळत कि धाकट्याला ला धुतलाय ते तडक अड्ड्यावर. तिथे येऊन ते एका गुंडाची कॉलर पकडतात आणि त्याला धुणार तेवढ्यात तिथे अड्ड्याचा मालक हजर. महागुरुंची मारामारीची तयारी पाहून ते त्याला म्हणतात, “ हे काय महागुरु, तुम्ही मारामारी करणार? काय हे? तुमच्या image काय  होणार?” महागुरूंना साक्षात्कार होतो व ते त्या गुंडाची कॉलर सोडतात. मालक त्याना सांगतात कि छोट्याला जिवंत ठेवतो १० लाख दे. महागुरुंकडे फक्त १०० ची नोट असल्याने ते direct ताईसाहेबांकडे पैसे मागायला. ताईसाहेब शरत खेळण्याच्या अटीवर पैसे द्यायला तयार होतात. महागुरू तयार होतात आणि धाकट्याला घेऊन थेट गावात शरतीची पराकटीस करायला.
      महागुरू शरतीसाठी गावात परतले आहेत हे Villain(मी शिवाजी राजे भोसले तील घोसालीया builder) ला कळतं. महागुरू आणि Villain शरतीची पराकटीस करायला थेट माळरानावर ते ही चारचाकी जीपमधून. तिथे दोघांची गळाभेट. शाब्दिक चकमकीनंतर महागुरूंचा डायलॉग, “ वाघ एकटा फिरतो अन तुझ्यासारखी कुत्री कळपानं”. मालकाला कुत्रा म्हणतो हे ऐकून एक नमकहलाल नोकर महागुरुंवर धावून जातो पण महागुरू त्याचा फडशापडून निघून जातात.
    इकडे संजय(धाकटयाचं पाळण्यातलं नाव) त्याला शोभेल अशी कामं करत गावातून हिंडत असतो. चोरलेल्या गाडीत पेट्रोल भरायचं असतं म्हणून पंपावर जातो. तिथे येते त्याची होणारी Heroin(अजून जमायचं म्हणून होणारी) येते. जन्मजात पुणेकर असलेल्या मुलीसारखा Attitude दाखवत कमी डोकं चालवून संजयलाच १००० रु. देऊन टाकी फुल करायला सांगते. ते ही यड पेट्रोल भरतं आणि गावात टाईमपास मिळाला म्हणून गावं आवडू लागतं. दरम्यान इकडे महागुरू शरतीसाठी बैल शोधत असतात. महागुरू सर्व पाहिलेली बैलं चांगली आहेत असं सांगतात. प्रतापराव ही सगळी बैलं विकत घेतात. ताईसाहेबांना ही हकीकत समजते आणि त्या परेशान होऊन बसतात. महागुरू सर्व ऐकून घेतात आणि म्हणतात की ते सर्व बैल चांगले आहेत पण शरतीसाठी नाही.  महागुरुंच्या चलाखीमुळे प्रतापराव ह्या सर्व बैलांचं काय करायचं ह्या विचाराने डोक्याला हात लावून बसतात.
     धनंजय आणि संजय कडे बघून ताईसाहेब म्हणतात आता बैल कोण व कुठे मिळणार ? तेवढ्यात तल्लख बुद्धीचे महागुरू सांगतात की लहानपणीच्या शरतीमध्ये अधू झालेल्या आपल्या बैलांची मी खोंड(पिल्लं) शोधतोय आणि ती खोंड मला घावली आहेत. इथे महागुरूंनी त्या बैलांच्या पिलावळीला बदला घ्यायची संधी दिली. तेरी मेहेराबानिया या हिंदी चित्रपटाची पुढची स्टेप. आनंद झाला मराठी सिनेमा ने हिंदी सिनेमाला मागे टाकलं.महागुरुंना बैलं घावली म्हंजी Interval व्हायला हवा. Interval पडद्यावर लिहून येतं “श्वास रोखून धरा, धुराळा उडणार आहे”. हे वाचून खरच श्वास कोंडल्या सारखं झालं. म्हणून जगाचा उठलो आणि सहज नजर टाकली थेटरात तर लक्षात आलं की आत्ता पर्यंत जितकी पात्र ओळख झाली त्याही पेक्षा कमी लोकं  थेटरात मौजूद होती. तुम्ही हा सिनेमा बघताय हे जर लोकांना कळलं तर लोकं हासतील ह्या विचाराने आहे तिथेच बसून Interval संपायची वाट पहात होतो.
     चित्रपट सुरु झाल्यावर पडद्यावर कुठेही Recap लिहिलेलं नव्हत हे पाहून सुस्कार सोडला. कारण महागुरू आणि action movie काही सांगता येत नाही. शरतीची पराकाटीस जोरात चालू होती आणि संजय पण Heroin च्या मागे पुढे धावत होता. Heroin म्हणजे ताईसाहेबांची ल्येक अन ती बी शहरात गुरांच्या डाक्टरकीची पढाई करत असती. ह्या बाई  morning walk म्हणून डोंगर द-यातून पळत असतात. आणि Hutch network चं ब्रीद वाक्य लक्षात ठेवून संजयराव मागे असतातच. डोंगर उतरताना साहेब तिला पटवतात आणि लगेच एक गाणं उरकून घेतात. गाणं गाऊन दमतात आणि एका तळ्याकाठी बसतात. महागुरूंना संजय चा ह्यो खेळ करतो आणि ते त्याला commitment ह्या विषयी lecture द्यायचा प्रयत्न करतात पण वैचारिक मतभेदांमुळे ते शक्य होत नाही आणि ते निघून जातात.
     पुढे महागुरूंचा Happy वाला Birthday म्हणजे बैलपोळा असतो. त्यांना जुन्या बैलांची याद येते म्हणून ते त्या बैलांकडे जातात. इकडे गावातील सर्व बैलांची मिरवणूक निघते व सगळा गाव देवळाच्या हितं जमा व्हतो. तिथे कोन पल्यांदा पूजा करणार ह्या वरून परतापराव व ताईसाहेब ह्यांचं भांडणं व्हनार तेवढ्यात तिथं पोलीस येतात आणि परत्येक गोष्टीची जाग ठरलेली असते हे सांगण्यासाठी एक example देतात. Example काय तर डाक्टर जर रस्त्यात भेटला तर आपण तिथच चड्डी काढून सुई टोचून घेतो का, नाही ना. मंग ही भांडायची जाग नाही. तिथं त्ये सगळ्यांना एक सरकारी कागूद दाखवतात. त्यो कागद म्हंजी यंदाच्या वर्षापासूनच शरत व्हनार नाय कारन पुलाच काम लवकर सुरु होणार.
     परतापराव लय खुश कारण दरवर्षी त्यालाच पल्यांदा पूजा कराया मिळणार. म्हणून त्ये एक लावणीचा प्रोग्राम ठेवतात सोत्ताच्या वाड्यावर. ही लावणी म्हंजी दुसरं आयटम सॉँग. ह्यात भार्गवी चिरमुले जंगलात डूलातोय नाग ह्या गाण्यावर हातवारे करून नाचत असते. तिचे हातवारे कदाचित कळणार नाही प्रेक्षकांना म्हणून एका खुर्चीचा हात बी नागावानी दाखवला आहे गाण्यात. बहुधा ह्या गाण्यात चांगली नाचालीस तर महागुरू तुला स्टेज वर बोलवून १०० ची नोट देणार अस कुणीतरी तिला सांगितलं असावं कारण तिनं जास्तीच energy दाखवली होती नाचताना. लावणी घरीच असल्याने परातापरावांच्या बायकोला काय त्ये आवडत नाय. तिचा एकंदरीत स्क्रीन वरील वावर बघून मित्राने लगेच सुचवलं की हिचं आणि महागुरुंच झेंगाट असणार आणि त्ये खरचं असत. मराठी प्रेक्षक किती जाणकार आहे ह्याचा प्रत्यय आला तेंव्हा.
     लावणी आणि फुकटच तीर्थ पिऊन पोलीस आणि इतर नोकर सातवे आसमान पार असतात. तेवढ्यात परातापराव सांगतो की नोटीस खोटी व्हती, मीच खोटे शिक्के मारून ती पोलिसाच्या हातात दिली आणि ती ह्यान तिथं वाचली. मालकांची ही हुशारी पाहून नोकर, ‘जहापना तुस्सी ग्रेट हो’ हे म्हणायच्या बेतात उठतात पण तीर्थ effect मुळे शक्य होत नाही. पोलीस खात्याचा अपमान पोलिसाच्या फारच जिव्हारी लागतोव तो तडक जाऊन ताईसाहेबांना खरा सांगतो. परातापराव ताईसाहेबांच्या घरी विचारायला की धन्या कनच्या शरतीची पराकटीस करतोय. तिथं त्यांला त्योच कर्तव्यदक्ष पोलीस भेटतो अन सांगतो की मला माहित व्हत नोटीस खोटी होते त्ये. पण म्या मुद्दामच तुम्हाला धडा शिकवाया समद्यांसमोर ही नोटीस दिली. बसा बोंबलत आता महागुरुंची पराकटीस जोरात चालू हाय. परतापराव चिडून निघून जातात. अन कशी चीटींग करायची ह्याची रणनीती आखतात.
    फष्ट स्टेप म्हणून त्ये धन्याच्या बैलांना आजारी पाडण्यासाठी बैलांच्या खुराकात औषध मिसळतो व शरत तोंडावर आली असताना बैल आजारी. घरचीच पोरगी गुरांची डाक्टर असल्यानं डाक्टर शोधायचा तरास वाचतो. ते जाहीर करते बैल ८ दिवस चालू पण शकणार नाहीत. महागुरू हे ऐकून रडून रडून गोंधळ घालतात आणि तडक महादेवाच मंदिर गाठतात. तिथे जाऊन त्ये महादेवाला साकडं न घालता नंदीला साकडं घालतात. उनकी दूवाऍ कुबूल होकार बैलं जागच्या जागी उभं राहतात. शरतीसाठी तयार. पहिला प्रयत्न नाकामियाब झाला म्हणून परतापरावांच तीर्थ प्राशन सुरु. शुद्धीत आल्यावर महागुरुंची सुपारी दोघांना देतात आणि आधी सारखंच काम गुपचूप कराया सांगतात. काम गुपचूप व्हावं व हे काम कोनी केलं हे प्रेक्षकांना पण कळू नये याची खबरदारी कॅमेरामन ने घेतली आहे.
    हा सर्व संवाद परातापारावांची बायकू ऐकती आणि महागुरुंना सावध कराया(खरं प्रेम असतं ना) महादेवाच्या मंदिरात रातच्या पारी जाती. तिथं महागुरु तिला Break up च्या येळी घेतलेली शपथ आठवाया सांगतात(की पुना कधीबी भेटायचं नाही म्हणून). त्यांचा गप्पा रंगत असतानाच येवढ्या रात्री आपली बायकू कुठं गेली ह्याचा शोध घेत तीर्थाच्या नशेत परातापाराव मंदिरात पोचतात. तिथं ह्या दोघांचा संवाद ऐकून त्ये महागुरुंना धमकी देतात की जरा त्ये शरत नाही हरले तर त्ये त्यांच्या प्रेमाचा म्हंजी सोत्ताच्या बायकोचा खून करतील. त्यांचं हे सर्व संभाषण ताईसाहेब ऐकतात.(त्या तिथे कुठून) हा प्रश्न मला हे अजून पडला आहे. आता धनंजय काय करनार? ह्याचा विचार करीत त्या वाड्यावर येतात व thinking chair मध्ये बसतात. तेवढ्यात त्यांना हसण्या-खिदळण्याचे आवाज येतात. हे कोण याचा शोध घेता लक्षात येत की हे तर आपली कार्टी अन संजय आहे. पुढं काही व्हायच्या आत त्या खाली कार्टीला आणाया येतात. इकडं ह्या दोघांचं Propose -Propose खेळणं चालू असतं. ताईसाहेबांना बघून दोघेही निराशेने निघून जातात.
    ह्या नंतर सुरु होते Climax ची शरत. शरतीसाठी सारे गावकरी तयार. महागुरुंच्या शेजारी परातापाराव. त्ये त्यांला दिलेली धमकी आठवाया सांगतात. त्यांचा संवाद बघून ताईसाहेब तिथं येतात. त्या काही बोलायच्या आत त्यांची ल्येक तिथं येऊन विचारते, “माझ्या संजय ला कुठे लपवलं आहेस?” आपलं काम लेकीने सोपं केलं या खुशीत त्या धनंजयकडं बघतात. धनंजय चवताळून शरत सोडून निघून जायच्या तयारीत असताना ताईसाहेब सांगतात की आपल्या ऊसाच्या कारखान्यात बांधून ठेवलाय त्याला. एक ऊसाची मोळी कट व्हायला १२ मिनीट लागतात तव्हां १० मिनिटात शरत जिकून भावाला वाचवा. ह्ये सगळं ऐकून परातापाराव बायाकूला बोलिवतात महागुरूंना लक्षात येन्यासाठी. साधारण ४३-४७ सेकंद background दोन्ही धमक्या आळी पाळीनं along with music वाजवल्या जातात. महागुरुंसमोर पेचप्रसंग कोणाला वाचवावं? अर्थात कोणालाही वाचवलं तरी प्रेमाचाच विजय होनार असतो. फक्त बंधुप्रेम की प्रेयासीप्रेम हे ठरत नसतं. शेवटी प्रेयासीप्रेमाचा त्याग करायचा ठरवतात. शरत सुरु होते.
     नेहमीप्रमाणे शरतीमध्ये Villain ची लोकं Hero ला हरवाया असतातच. त्ये महागुरुंची कोंडी कराया बघतात पण नाकामियाब होतात. ह्ये पण Fail झालं म्हणाल्यावर परातापाराव दुसरा मानूस सोडतात.  त्यो मानूस लगेच Splendor किक मारतो अन गाडी ३६०॰ मध्ये वळवून महागुरुंच्या मागं लागतो. त्याचं काम म्हणजे महागुरुंच्या बैलांना छळायच. पण महागुरू त्याचा ही समाचार घेतात आणि सर्व अडथळ्यांची शर्यत पर करत शरत जिकतात व बक्षिस समारंभाला कल्टी देऊन थेट कारखान्यात भावाला वाचवायला. २-३ वेळा हाक मारून हे काही उत्तर येत नाहे. आणि अचानक वरतून २ माणसं खाली पडतात. हीच ती २ मानसं ज्यांला सुपारी मिळाली असते. ह्यांना कोन मारतं तर संजय. ही मारामारी Flash back मधी दावली हाय. संजय भेटल्यावर तिथं ताईसाहेब अन डाक्टरीन बाई येतात आणि सांगतात की आई ला आपलं प्रेम मान्य आहे आणि ती आपलं लग्न लावून द्यायला तयार आहे. सगळे खुश होऊन चला लग्नाच्या तयारीला लागूयात हाय विचाराने निघणार तेवढं तिथं परतापराव सपत्निक हजर अन त्ये बी बैलगाडीतून.
परतापरावांचा डायलॉग, “हिला तिकडंच मारणार होतो पण तिला तुझ्यासमोर मला मारायचं व्हतं.” महागुरू शिताफीने पराभीला सोडीवतात आणि परतापारावाला मार-मार मारतात. त्याचा जीव घेण्यासाठी त्ये एक दगूड अगदी सहज उचलतात. उचलताना दगड अगदी लहान वाटतो पण thanks to zoom effect दोन्ही दगड एकदम मोठे दिसतात. तेवढ्यात पराभीच पतिप्रेम जागं होतं आणि “बुरा है भला है जैसा भी है मेरा पती मेरा देवता है” या गाण्याप्रमाणे त्या पतीच्या जीवाची भीक मागतात. ते पण मोठ्या मनाने परतापारावाला सोडतात. तर ह्याला परत किडा बायकोल मारायचा, पुन्हा बंदूक हातात घेतात. हा सगळा चाललेला खेळ पाहून परातापरावांची बैलं वैतागतात. आपल्या मालाकीने आपल्यावर किती माया केली हे आठवूनत्येचा परातापरावाला शिंगणे भोकसून मारून टाकतात. अंत में बुराई खात्मा और सच्चाई की जीत. हुश्श दमलो. तुम्ही पण दमला असाल.
     मी पण धक्क्यातून सावरत( महागुरूंचा action चित्रपट हा धक्काच आहे.) चित्रपटगृहाच्या बाहेर पडलो. हा फक्त माझा point of view होता पिक्चरचा. इतर दोन मित्रांचा वेगळाही असेल पण पुन्हा त्याच पिक्चरवर चर्चा करायची माझी हिम्मत नव्हती. म्हणून खाण्यासाठी जन्म आपुला हे आयुष्याचं ध्येय लक्षात घेऊन गाडी हाटेलाच्या दिशेने हाकली.